महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा; योजनांच्या व्यापक प्रसाराला गती देण्याचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा; योजनांच्या व्यापक प्रसाराला गती देण्याचे निर्देश

नागपूर (प्रतिनिधी) :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानभवनातील दालनात घेतला. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि गती आणून लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आढावा बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, ॲड. राहुल कुल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख आणि वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.

बैठकीत महामंडळाच्या सध्याच्या योजनांची प्रगती, निधी वितरण, लाभार्थ्यांची संख्या, सुरू असलेल्या कर्ज व स्वयंरोजगार योजनांची पडताळणी यांवर सविस्तर चर्चा झाली. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे निदर्शनास आल्याने मंत्री विखे-पाटील यांनी जिल्हा व विभागनिहाय कार्यक्रम, विशेष मेळावे, माहितीपर उपक्रम आणि जनजागृती मोहिमा आयोजित करून योजनांचा प्रचार वाढवण्याचे निर्देश दिले.

याशिवाय, महामंडळाचे संकेतस्थळ अद्याप सुरू नसल्याने नागरिकांना माहिती मिळण्यात अडथळे येत असल्याचेही बैठकीत समोर आले. त्यानुसार, संकेतस्थळ तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश मंत्री विखे-पाटील यांनी दिले.

राज्य सरकारच्या मदतीने आर्थिक मागास प्रवर्गातील युवक-युवतींना रोजगार, उद्योजकता आणि स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यासाठी महामंडळाच्या योजनांना अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!