मुरूम तस्करांचा वन अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; टिप्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न, चौघांविरोधात गुन्हा
मुरूम तस्करांचा वन अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; टिप्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न, चौघांविरोधात गुन्हा
पंढरपूर (प्रतिनिधी):- करकंब/खरातवाडी येथील वनपरिक्षेत्रात अवैध मुरूम तस्करी रोखताना मुरूम तस्करांनी थेट वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) शीतल बालाजी चाटे यांच्यावर मुरूमाने भरलेला टिप्पर अंगावर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी वेळीच बाजूला उडी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
मंगळवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास शीतल चाटे व वनपाल बापूराव भोई हे खरातवाडी वनक्षेत्रात गस्तीवर होते. यावेळी गट क्रमांक २८० मधून तीन टिप्पर अवैध गौण खनिज (मुरूम) भरून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यातील एक टिप्पर (एमएच १६ ए.वाय. ६८१६) क्रमांकाचा असून उर्वरित दोन टिप्पर विना नंबर प्लेटचे होते.
श्रीमती चाटे यांनी स्वतःची ओळख वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सांगून वाहनचालकांना थांबवले व परवान्याची मागणी केली. मात्र चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासाअंती टिप्परमध्ये अवैध मुरूम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहने जप्त करून वन कार्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, जप्तीची कारवाई सुरू असताना आरोपी सिद्धार्थ चंद्रकांत नाईकनवरे (रा. व्होळे, ता. पंढरपूर) याने बनाव करून टिप्पर थांबवला. अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्याने अर्वाच्य शिवीगाळ करत ‘वनविभाग तुमच्या बापाचा नाही’ असे म्हणत वाद घातला. त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेला एक अनोळखी इसम घटनास्थळी आला. त्याने शीतल चाटे यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला व टिप्पर सुरू केला.
‘बाजूला व्हा, नाहीतर टिप्पर अंगावर घालीन,’ अशी धमकी देत त्या इसमाने मुरूमाने भरलेला टिप्पर थेट शीतल चाटे यांच्या दिशेने घातला. या हल्ल्यातून चाटे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली व आपला जीव वाचवला. सुदैवाने त्यांना कोणतीही शारीरिक दुखापत झाली नाही. मात्र आरोपींनी शासकीय जप्तीतील टिप्पर घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेप्रकरणी शीतल चाटे यांच्या फिर्यादीवरून करकंब पोलीस ठाण्यात सिद्धार्थ चंद्रकांत नाईकनवरे, चंद्रकांत बाळासाहेब घोडके (रा. व्होळे, ता. पंढरपूर) व दोन अनोळखी इसमांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.
वन अधिकाऱ्यांवर थेट जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून अवैध गौण खनिज तस्करीविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.


