महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेची जय्यत तयारी; सुवर्ण बुद्ध विहार परिसरात भव्य नियोजन पूर्ण

आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेची जय्यत तयारी; सुवर्ण बुद्ध विहार परिसरात भव्य नियोजन पूर्ण

नांदेड (प्रतिनिधी):- जागतिक धम्म ध्वज दिनानिमित्त दि. ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मांडाखळी–उमरी येथील सुवर्ण बुद्ध विहाराच्या परिसरात भव्य स्वरूपात नियोजन करण्यात आले आहे. तब्बल दहा एकर प्रशस्त जागेवर आकर्षक पेंडॉल, सजावट आणि सुसज्ज सुविधा उभारण्यात आल्या असून धम्म उपासकांसाठी सर्व सोयी काळजीपूर्वक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या परिषदेच्या तयारीची आज आयोजक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली. संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व भव्य स्वरूपाचे असून, उपस्थित राहणाऱ्या हजारो धम्म अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत विविध देशांतील विद्वान बौद्ध भिक्खू संघ सहभागी होणार असून, त्यांच्या अमृतवाणीतून तथागत भगवान बुद्धांच्या धम्मविचारांचा बौद्ध अनुयायांना लाभ मिळणार आहे. जागतिक पातळीवरील बौद्ध विचारांचे आदानप्रदान या परिषदेमध्ये होणार असल्याने धम्म उपासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

परिषदेच्या सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या बुद्ध व भीम गीतांची संगीत रजनी आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमाकडे विशेष आकर्षण आहे. या कार्यक्रमामुळे धम्म परिषदेला सांस्कृतिक अधिष्ठानही लाभणार आहे.

दि. ८ जानेवारी रोजी सुवर्ण बुद्ध विहार, मांडाखळी–उमरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेसाठी सर्व बौद्ध उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!