भाजपला धक्का : माजी जि.प. सदस्य अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, सांगोला तालुकाध्यक्षपदी निवड
भाजपला धक्का : माजी जि.प. सदस्य अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, सांगोला तालुकाध्यक्षपदी निवड
सांगोला (प्रतिनिधी):- मेथवडे (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील नामवंत उद्योगपती व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अतुल प्रभाकर पवार यांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे. या घडामोडीमुळे सांगोला तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अतुल पवार हे यापूर्वी भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत होते. संघटन बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्कात त्यांचा प्रभाव मोठा मानला जातो. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना निवडून आणण्यात अतुल पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला असल्याचे राजकीय वर्तुळात मान्य केले जाते.

तसेच सन 2024 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतुल पवार यांनी बाबासाहेब देशमुख यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले असून, स्थानिक राजकारणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अतुल पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकरी, युवक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेतून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतुल पवार यांच्या प्रवेशामुळे व तालुकाध्यक्षपदाच्या नियुक्तीमुळे सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात आहे.



