क्राईम

पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री थरार; बंदुकीचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटले

पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री थरार; बंदुकीचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटले

पुणे (प्रतिनिधी):- पुणे–सोलापूर महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री प्रवाशांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अक्कलकोट व तुळजापूर येथून देवदर्शन करून पुण्याकडे परतणाऱ्या एका कुटुंबाला तीन सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब कार क्रमांक MH 14 MT 4609 मधून तुळजापूर आणि येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात होते. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास कुरकुंभ येथील पुलाच्या पुढे काही कारणास्तव त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी केली. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात दरोडेखोरांनी कारला घेराव घातला.

दरोडेखोरांनी प्रवाशांना बंदुकीचा धाक दाखवून भीतीचे वातावरण निर्माण केले. यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर दहशतीखाली कारमधील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून घेतले. दरोडा टाकल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (LCB) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, त्याआधारे दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, पुणे–सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी वाहन उभी करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोलिसांनी पुन्हा एकदा दिला आहे. यापूर्वीही पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे की, प्रवाशांनी विश्रांतीसाठी हॉटेल, पेट्रोल पंप किंवा वर्दळीच्या चौक व नाक्यांचाच वापर करावा.

या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या प्रवासादरम्यान अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी गस्त वाढवली असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!