निवडणूक तयारीत असलेल्या किन्नर नेत्याचा खून; लष्कर मुर्गीनाला हादरला
निवडणूक तयारीत असलेल्या किन्नर नेत्याचा खून; लष्कर मुर्गीनाला हादरला
सोलापूर (प्रतिनिधी):- शहरातील लष्कर भागातील मुर्गीनाला परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एमआयएम पक्षाकडून प्रभाग क्रमांक १६ मधून इच्छुक नगरसेवक असलेल्या तृतीयपंथी आयुब सय्यद (वय ५०) यांचा त्यांच्या घरात निर्घृण खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराचे दार उघडून पाहिले असता आयुब सय्यद हे बेडवर निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडावर उशी ठेवलेली असून उशीच्या सहाय्याने गुदमरवून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आयुब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले होते. प्रभागात त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती तसेच परिसरात प्रचाराचे बॅनरही लावण्यात आले होते. मात्र अशा वेळी अचानक घडलेल्या या हत्येने राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्येही प्रचंड खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर घराशेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता रात्री दोन ते तीनच्या सुमारास आयुब यांच्या घरातून तिघे अज्ञात इसम बाहेर पडताना दिसून आले आहेत. त्यांच्या हातात बॅग असून डोक्यावर टोपी व पायात पांढरे बूट असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.
आयुब सय्यद यांचा मृतदेह शवेविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आयुब हे मनमिळावू व सर्वांशी चांगले संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यांच्या घरात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याने लुटीच्या उद्देशाने हा खून झाला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणासाठी केला, याचा सखोल तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून आरोपींचा लवकरच शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


