क्राईम

कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतुकीचा आणखी एक बळी; ट्रॅफिक जाममुळे वेळेत मदत न मिळाल्याने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतुकीचा आणखी एक बळी; ट्रॅफिक जाममुळे वेळेत मदत न मिळाल्याने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

पुणे (प्रतिनिधी): कात्रज–कोंढवा रोडवरील वाहतूक नियोजनाचा बोजवारा पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवावर बेतल्याची संतापजनक घटना आज घडली. कोंढवा रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दुपारी माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याने वाहतूक तळ्याजवळ वळविण्यात आली होती. मात्र, योग्य सूचना फलक, स्पष्ट मार्गदर्शन आणि वाहतूक नियंत्रणाच्या अभावामुळे एका निष्पाप जीवाला आपला प्राण गमवावा लागला.

वाहतुकीचा अंदाज न आल्याने जे.एस.पी.एम. संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती रमाताई कापडी या भीषण अपघाताच्या बळी ठरल्या. कोंढवा रोडवरील अवजड वाहनांच्या गर्दीत त्यांची दुचाकी ट्रकखाली सापडली. अपघातानंतर परिसरात प्रचंड ट्रॅफिक जाम झाल्यामुळे रुग्णवाहिका आणि मदतकार्य वेळेत पोहोचू शकले नाही. घटनास्थळीच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले.

Oplus_16908288

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “कार्यक्रमासाठी रस्ता वळवायचा असेल तर आधीच योग्य नियोजन, पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती आणि प्रत्यक्ष मैदानात सक्षम वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक असते. मात्र येथे केवळ औपचारिकता पार पाडली गेली,” असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतूक, अवजड वाहनांची मुक्त संचार व्यवस्था, अपुरी वाहतूक पोलीस बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवांसाठी मोकळा मार्ग न ठेवणे—या सगळ्यांचा फटका एका कुटुंबाला बसला आहे. “याला जबाबदार कोण?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित प्रशासन, वाहतूक विभाग आणि कार्यक्रम आयोजकांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, श्रीमती रमाताई कापडी यांच्या आकस्मिक निधनाने शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी शासनाने तातडीची मदत, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व विविध संघटनांकडून केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!