प्रा. छाया बोरकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्ड’ने गौरव
प्रा. छाया बोरकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्ड’ने गौरव
नवी दिल्ली :- ४१ व्या भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय दलित साहित्य संमेलन १२ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या साहित्य संमेलनात साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रा. छाया तानबाजी बोरकर यांना सन २०२५ चा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
भारतीय दलित साहित्य अकादमी अंतर्गत आयोजित या राष्ट्रीय संमेलनात देश-विदेशातील नामवंत साहित्यिक, विचारवंत, कलावंत, संशोधक व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मान्यवरांच्या साक्षीने प्रा. छाया बोरकर यांचा गौरव करण्यात आला.
प्रा. छाया बोरकर यांनी साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांची अनेक साहित्यकृती प्रकाशित असून, काही महत्त्वाची पुस्तके सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या लेखनातून सामाजिक वास्तव, स्त्री प्रश्न, समता, न्याय आणि आंबेडकरी विचारधारा ठळकपणे मांडली जाते. तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी वंचित घटकांसाठी सातत्याने काम केले असून, त्यांचे योगदान सर्वत्र कौतुकास्पद मानले जाते.
या पुरस्काराद्वारे त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तिगत गौरव नसून, आंबेडकरी विचारधारेवर आधारित साहित्य व समाजकार्याला मिळालेली मान्यता असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या पुरस्कारामुळे प्रा. छाया बोरकर यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही त्या साहित्य व समाजकार्यात अधिक जोमाने योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



