महाराष्ट्र

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर लगाम; खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा

दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित होणार

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर लगाम; खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा

दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित होणार

मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात खत विक्रीमध्ये होणाऱ्या अनियमितता आणि शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी सरकार कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. खत विक्रीत नियमभंग आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने केवळ १५ दिवसांसाठी नव्हे तर थेट सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. शेतकऱ्यांना योग्य दरात व वेळेवर खत उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासन अधिक कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य राजेश पवार यांनी खत विक्रीतील गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य नाना पटोले, जयंत पाटील आणि अभिजित पाटील यांनीही सहभाग घेत शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले.

*नायगावमध्ये सात खत विक्रेत्यांवर कारवाई*

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात खताच्या दरवाढीबाबत आणि उपलब्धतेबाबत शेतकरी पुत्र संघर्ष समितीने तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तपास सुरू केला. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष भरारी पथक स्थापन केले.

या पथकाने ८ डिसेंबर २०२५ रोजी नायगाव येथील सात रासायनिक खत विक्री केंद्रांची तपासणी केली.
तपासणीत

* चार विक्रेत्यांनी निश्चित दरापेक्षा जास्त दराने खत विक्री केली,

* तर तीन विक्रेत्यांनी साठा असूनही शेतकऱ्यांना खत नाकारल्याचे उघड झाले.

या गंभीर प्रकारामुळे संबंधित सातही विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना देण्यात आले असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री भरणे यांनी सांगितले.

*राज्यभर मोठ्या प्रमाणात तपासण्या*

राज्यात बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू आहेत.

१ एप्रिल २०२५ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरात

* १,१४,८६० खत विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.

* त्यापैकी १,५४३ विक्रेत्यांचे परवाने निलंबित,

* १,१७४ परवाने रद्द,

* तर २,९५६ विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले.

तसेच २,१४९ उत्पादनांची तपासणी करून ५२,९१० नमुने तपासण्यात आले. यामध्ये ३,४६२ नमुने अप्रामाणिक आढळले असून सुमारे ३,१०० मेट्रिक टन खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये १४७ जणांवर पोलीस गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही कृषी मंत्र्यांनी दिली.

राज्यात सध्या खताचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना खताच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वासही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!