सोलापूर

ग्रामीण युवक-युवतींसाठी समाजकल्याण विभागाचा मोठा पुढाकार

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, ब्युटी पार्लर कोर्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात सेल्फी पॉईंट व म्युझियम उभारणार

ग्रामीण युवक-युवतींसाठी समाजकल्याण विभागाचा मोठा पुढाकार

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, ब्युटी पार्लर कोर्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात सेल्फी पॉईंट व म्युझियम उभारणार

सोलापूर :- ग्रामीण भागातील मागासवर्गीय, गरीब आणि गरजू युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. विशेषतः पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आणि ग्रामीण मुलींसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण या योजनांवर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी दिली.

समाजकल्याण समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सातपुते म्हणाल्या की, ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती आर्थिक परिस्थितीमुळे खासगी प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद स्तरावर मोफत किंवा अत्यल्प शुल्कात प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी लेखी परीक्षा मार्गदर्शन, धावणे, मैदानी सराव, शारीरिक क्षमता विकास आणि अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अशा सर्व बाबींचा समावेश असलेले विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना शहरात जाऊन महागडे प्रशिक्षण घेणे शक्य नसल्याने हा उपक्रम मोठा आधार ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे. या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.

त्याचबरोबर एमएस-सीआयटी, टॅली, संगणक अभ्यासक्रम, टायपिंग प्रशिक्षण तसेच वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचाही प्रस्ताव आहे. आधुनिक रोजगार क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी डिजिटल कौशल्यांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय होणार आकर्षणाचे केंद्र •

यावेळी सभापती संस्कृती सातपुते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अत्याधुनिक व म्युझियमच्या धर्तीवर सुसज्ज करण्यात येणार असून त्याचे काम  लवकरच सुरू करणार आहोत.

या वाचनालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि भारतीय संविधानाच्या महत्त्वाचा प्रभावी पद्धतीने परिचय करून देण्यात येणार आहे. विशेषतः संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये आणि संविधानाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी आधुनिक पद्धतीने माहिती सादर केली जाणार आहे.

वाचनालयामध्ये आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरिकांना संविधान देत असल्याची संकल्पना साकारण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अकलूज येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. यासाठी आवश्यक जागा व निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून, सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती सातपुते यांनी दिली.

सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असून, पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी नियुक्त करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!