कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा
राज्यात अव्वल कामगिरी; सीईओ कुलदीप जंगम यांचा विशेष गौरव

कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा
राज्यात अव्वल कामगिरी; सीईओ कुलदीप जंगम यांचा विशेष गौरव
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेत भव्य सत्कार सोहळा पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, अजिनाथ देशमुख, नेताजी खंडागळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले की, निधीच्या अडचणी असूनही संजय धनशेट्टी यांनी जलजीवन मिशनची कामे अत्यंत वेगाने पूर्ण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २४० पाणीपुरवठा कामे पूर्ण झाली. विशेष म्हणजे, टँकरची संख्या २१४ वरून ६९ वर आणण्यात यश मिळाले, ही मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले.
धनशेट्टी यांनी गावपातळीवर ठेकेदार, पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधत कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली, असेही जंगम यांनी गौरवोद्गार काढले.
उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील त्यांच्या कामाचा विशेष उल्लेख करत, “हाती घेतलेले काम तडीस नेणारा अधिकारी” अशी त्यांची ओळख असल्याचे सांगितले.
महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जलजीवन मिशन ही दिशादर्शक योजना असून, तिच्या यशात धनशेट्टी यांचे योगदान मोलाचे असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. स्वागत रणजित घोडके यांनी केले.
यावेळी विद्याधर राठोड (अक्कलकोट), अजित वाघमारे (बार्शी-माढा), वाहेकर (करमाळा), नितीन करवते (पंढरपूर), वसीम शेख (मोहोळ), बेंबळगी (उत्तर सोलापूर), प्रसाद काटकर (मंगळवेढा), दत्तात्रय सोनवणे (दक्षिण सोलापूर), प्रकाश शेंडगे, अमित सलगर, सदाशिव पुजारी (सांगोला) यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*सीईओ कुलदीप जंगम यांचाही गौरव*
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देण्यात आले.
जिल्हा परिषदेला १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात मानाचे स्थान मिळवून देण्यात जंगम यांचे नेतृत्व निर्णायक ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रणजित घोडके, सचिन जाधव, योगेश कुंभार, अमित, बापू शेंडगे, ओम बुरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.




