सोलापूर (प्रतिनिधी) :- मोहोळ तालुक्यातील अर्धनारी परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास जातीवाचक शिवीगाळ, खंडणी मागणी व मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमित श्रीनिवास पवार, सुशांत वासुदेव ढवळे आणि विनायक भास्कर भोसले यांना सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
ही घटना ऑक्टोबर २०१८ मधील असून मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथे फिर्यादी वाळू भरलेला डंपिंग ट्रॅक्टर सरकारी रस्त्याने नेत असताना आरोपींनी रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाडी अडविल्याचा आरोप फिर्यादीने केला होता.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी ट्रॅक्टर चालकाकडे प्रत्येक खेपेस ५०० रुपये खंडणीची मागणी करून विरोध केल्यास जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास डी.वाय.एस.पी. चंद्रकांत खांडवी यांनी केला होता आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. हर्षवर्धन मल्लप्पा शिंदे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, फिर्यादीने दिलेली तक्रार आणि न्यायालयात दिलेला जबाब यामध्ये मोलाची विसंगती आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांच्या जबाबातही परस्परविरोधी माहिती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत सदर गुन्ह्यात आरोपी दोषी असल्याचे पर्याप्त पुरावे उपलब्ध नसल्याने, जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी तिघाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या निर्णयामुळे पुरावे, साक्ष आणि जबाबांची सुसंगती न्यायनिर्णयात किती महत्त्वाची असते हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. तसेच एससी-एसटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये तक्रार आणि साक्षी स्पष्ट व सुसंगत असणे आवश्यक असल्याचे या निर्णयातून अधोरेखित होते.

More Stories
माळढोक अभयारण्यात वन विभागाची धडक कारवाई; मुरूम उपशात वापरलेली टिपर व जेसीबी जप्त
शिवरस्ता मोजणी प्रकरणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; भूमी अभिलेख अधिकारी दीड लाखांची लाच घेतांना अटक
लाचेसाठी ‘डील’ आणि केसात हात फिरवत सिग्नल — महिला पोलीस अंमलदार ₹२०,००० घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकली!”