मोठा पगार, पण लालसा कायम; नायब तहसीलदार लाचेच्या रकमेसह रंगेहाथ
नांदेड (प्रतिनिधी) :-सरकारी पद आणि लाखोंचा पगार असूनही भ्रष्टाचाराचा मोह सुटत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयात कार्यरत महिला नायब तहसीलदार सुमन संभाजी कऱ्हाळे यांना ACB पथकाने ५,७०० रुपयांची लाच घेताना अटक केली.या कारवाईनंतर संपूर्ण तालुक्यात भूपंपळ उडाली असून प्रशासनातील भ्रष्टाचारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हदगाव तालुक्यातील एका रेशन दुकानदाराचे मागील चार महिन्यांचे धान्य पुरवठ्याचे पेमेंट झाल्यानंतर त्याला ५,७०० रुपयांचे कमिशन मिळाले होते.
तसेच नोव्हेंबर महिन्याचे धान्य e-POS मशीनवर अपलोड झाले नव्हते, यासह नवीन २७ लाभार्थ्यांची नावे अपडेट करण्याची प्रक्रिया प्रलंबित होती.
यासाठी दुकानदाराने १८ नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी “चार महिन्यांच्या ५७ हजार रुपयांवर २० टक्के कमिशन द्या”अशी मागणी केल्याचे समोर आले आहे.
सततच्या चर्चेनंतर १० टक्के म्हणजेच ५,७०० रुपये देण्याचे ठरवले.ही रक्कम नायब तहसीलदारांनी थेट न मागता डेटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद आप्पाराव जाधव यांच्याकडे द्यायला सांगितली.दुकानदाराने हा प्रकार ACB कडे तक्रार स्वरूपात मांडला.यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी हदगाव तहसील कार्यालयात सापळा रचला.
पथकाने गोविंद जाधव यांना रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले, आणि लगेचच नायब तहसीलदार कऱ्हाळे यांना ताब्यात घेतले.कारवाई दरम्यान दोन मोबाईल फोन, नोंदी आणि व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे
रक्कम जप्त करण्यात आली.
नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना पोलिसांनी अटक केली असून गोविंद जाधव यांना वैद्यकीय कारणास्तव नोटीसवर सोडण्यात आले.या घटनेनंतर हदगाव आणि आसपासच्या भागात चर्चेचा विषय निर्माण झाला.
–


