सोलापूरकरांनो, पाणी जपून वापरा! दोन मुख्य जलवाहिन्या फुटल्याने पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम
पाकणी ते सोलापूर ८६४ मि.मी. आणि मडकी वस्ती परिसरातील १०१६ मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या नादुरुस्त; चार दिवसांऐवजी आता पाच दिवसांनी पाणीपुरवठ्याचे एक रोटेशन

सोलापूरकरांनो, पाणी जपून वापरा! दोन मुख्य जलवाहिन्या फुटल्याने पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम
पाकणी ते सोलापूर ८६४ मि.मी. आणि मडकी वस्ती परिसरातील १०१६ मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या नादुरुस्त; चार दिवसांऐवजी आता पाच दिवसांनी पाणीपुरवठ्याचे एक रोटेशन
सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा फटका बसला असून, दोन प्रमुख जलवाहिन्या नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. पाकणी ते सोलापूर दरम्यानची ८६४ मि.मी. व्यासाची मुख्य पंपिंग जलवाहिनी छत्रपती संभाजी महाराज चौकात मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता नादुरुस्त झाली. त्याचबरोबर मडकी वस्ती कोपऱ्यालगतची १०१६ मि.मी. व्यासाची पीएससी जलवाहिनीदेखील नादुरुस्त झाली आहे.
या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. मात्र, दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याने पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून सोलापूर शहरासाठी होणारा पाण्याचा उपसा तूर्तास बंद राहणार आहे.

या तांत्रिक बिघाडाचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार असून, बुधवार (दि. १८ नोव्हेंबर) पासून उजनी पाइपलाइनद्वारे होणारा पाणीपुरवठा तसेच भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटलजवळील हायलेव्हल टाकीवर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
विशेष म्हणजे, सध्या चार दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता एक रोटेशन पाच दिवसांच्या अंतराने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी आणखी एक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रभावित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महानगरपालिका यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.



