आषाढी वारीसाठी चंद्रभागा किनारी अभेद्य सुरक्षा कवच; १८० आपदा मित्र, १७ रेस्क्यू बोटी सज्ज
प्रथमच महिलांचे बचाव पथक वारीत सहभागी; गरज भासल्यास बोट ॲम्ब्युलन्सचीही सुविधा उपलब्ध

आषाढी वारीसाठी चंद्रभागा किनारी अभेद्य सुरक्षा कवच; १८० आपदा मित्र, १७ रेस्क्यू बोटी सज्ज
प्रथमच महिलांचे बचाव पथक वारीत सहभागी; गरज भासल्यास बोट ॲम्ब्युलन्सचीही सुविधा उपलब्ध
पंढरपूर : आषाढी वारीसाठी लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. चंद्रभागा नदी, घाट परिसर आणि पालखी मार्गावर कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी १८० प्रशिक्षित आपदा मित्र, १७ रेस्क्यू बोटी, अग्निशमन वाहने, रेस्क्यू व्हॅन तसेच अत्याधुनिक बचाव साहित्य तैनात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वारीत सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक प्रथमच सेवेत सहभागी होणार असून हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आपत्कालीन नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध विभागांचा समन्वय साधत सर्व यंत्रणा सतर्क ठेवली आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सहा अग्निशमन वाहने आणि एक अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे. पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले यांच्याकडे रेस्क्यू व्हॅनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नदीतील प्रवासी होड्यांसाठी १,०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले असून जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. जेडे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

चंद्रभागा नदीतील बचाव कार्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि एनडीआरएफच्या ४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय शंभर लाईफ जॅकेट, तीस लाईफ रिंग, नऊ वॉकी-टॉकी, पाच मेगाफोन, इन्फ्लेटेबल टेंट, स्टॅटिक रेस्क्यू रोप, टॉर्च, लेझर पॉइंटर आणि लाईट बॅटन यांसारखे आवश्यक बचाव साहित्यही उपलब्ध ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण यंत्रणेचे नेतृत्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले करत आहेत.
चंद्रभागा नदी परिसरात गस्त आणि बचाव कार्यासाठी एकूण १८० आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एनडीआरएफ, पुणे, कोल्हापूर, वाशीम, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि पंढरपूर येथील विविध स्वयंसेवी बचाव संस्था, आदिवासी रेस्क्यू कोळी समाज, महिला बचाव पथक तसेच पोलिस पाटील यांचा समावेश आहे. वारीच्या कालावधीत रेस्क्यू बोटींची तांत्रिक अडचण तातडीने दूर करण्यासाठी दोन मेकॅनिकही पंढरपूरमध्ये कायम तैनात राहणार आहेत.
यंदाच्या वारीतील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे महिलांचे स्वतंत्र बचाव पथक. या पथकाने २०२५ मधील सीना नदीच्या पुरात दक्षिण सोलापूर तालुक्यात सुमारे ३०० नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तसेच कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीतही त्यांनी यशस्वी बचाव कार्य केले आहे.
दरम्यान, रेड क्रॉसच्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध झाल्यास चंद्रभागा नदीत बोट ॲम्ब्युलन्स सुरू करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. त्यामुळे नदीपात्रात एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णाला तातडीने उपचारासाठी हलविणे शक्य होणार आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक चंद्रभागा स्नानासाठी येत असल्याने नदीपात्र, घाट परिसर आणि पालखी मार्गावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सतर्क राहणार असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व विभागांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



