पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा स्वच्छतेवर भर; ‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी’साठी ५० स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वारीपूर्वी चंद्रभागेत उजनीचे पाणी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गोरे यांची स्वच्छता, सुविधा व अतिक्रमणमुक्त पंढरपूरची स्पष्ट भूमिका

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा स्वच्छतेवर भर; ‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी’साठी ५० स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती
वारीपूर्वी चंद्रभागेत उजनीचे पाणी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गोरे यांची स्वच्छता, सुविधा व अतिक्रमणमुक्त पंढरपूरची स्पष्ट भूमिका
पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर प्रशासनाने सर्वंकष तयारीला वेग दिला असून, ‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, आनंदी वारी’ या संकल्पनेअंतर्गत चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची पाहणी करताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वच्छतेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि वारी संपेपर्यंत स्वच्छता अखंड सुरू ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री गोरे यांनी चंद्रभागा नदीपात्राच्या दोन्ही काठावरील झुडपे, राडारोडा आणि साचलेला कचरा पूर्णपणे हटवून परिसर स्वच्छ व सपाट करण्याचे निर्देश दिले. भाविकांना स्वच्छ वातावरणात स्नान करता यावे, यासाठी नदीकाठासह संपूर्ण वाळवंट परिसराची नियमित साफसफाई करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
स्वच्छता मोहिमेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली असून, वाळवंट परिसरात ५० स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात पाच कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून, प्लास्टिक व इतर कचरा संकलनासाठी मोठ्या कचरा कुंड्याही उभारल्या जाणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त कर्मचारीही या मोहिमेत कार्यरत आहेत.

यंदाच्या आषाढी वारीसाठी ३० ते ३२ लाख भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, वारीच्या तीन दिवस आधी नदीपात्रात पाणी पोहोचेल, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.
वारकऱ्यांच्या सुविधेसाठी वाळवंट परिसरात चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच दर्शन रांग अधिक सुलभ व्हावी यासाठी नवीन दर्शन मंडपाचे काम सुरू असून, जनक महाराज अपशिंगेकर यांच्या जागेत मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेसाठी नवीन शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सुलभ शौचालये, वैद्यकीय सेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

वारीदरम्यान वाहतुकीची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली असून, ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर शहर कायम अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



