सोलापूर ग्रामीण एलसीबीची मोठी कारवाई; विडीघरकुल येथील दोन घरफोड्यांचा उलगडा, सराईत चोरट्यास अटक
"35 गुन्ह्यांतील सराईत चोरटा जेरबंद" "दीड लाखांचा मुद्देमाल जप्त"

सोलापूर ग्रामीण एलसीबीची मोठी कारवाई; विडीघरकुल येथील दोन घरफोड्यांचा उलगडा, सराईत चोरट्यास अटक
“35 गुन्ह्यांतील सराईत चोरटा जेरबंद”
“दीड लाखांचा मुद्देमाल जप्त”
सोलापूर : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) घरफोडीच्या गुन्ह्यांविरोधात प्रभावी कारवाई करत दक्षिण सोलापूर तालुक्यातील विडीघरकुल (कुंभारी) परिसरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत सुमारे 10 ग्रॅम सोन्याचे व 90 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी विशेष मोहीम सुरू केली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
मोहोळ येथील शिवाजी चौक परिसरात गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, ढोकबाभूळगाव येथील एक रेकॉर्डवरील गुन्हेगार विडीघरकुल येथील घरफोडी प्रकरणात सहभागी आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव बंडू उर्फ बंदेनवाज मधूकर पवार (वय 25, रा. ढोकबाभूळगाव, ता. मोहोळ) असे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने साथीदार उमेश प्रकाश काळे (रा. मलिकपेठ, ता. मोहोळ) याच्या मदतीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी विडीघरकुल (कुंभारी) येथे रात्रीच्या वेळी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 182/2026 आणि 183/2026 असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असल्याची खात्री पोलिसांनी केली. आरोपीकडून चोरीतील 10 ग्रॅम सोन्याचे आणि 90 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत सुमारे 1.50 लाख रुपये आहे.
तपासात अटक करण्यात आलेला बंडू उर्फ बंदेनवाज पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मालमत्तेविषयक चोरीचे तब्बल 35 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



