सोलापूर

कृषी दिनी जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांचा गौरव; आधुनिक शेती, एल निनो व्यवस्थापन आणि शासन योजनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारीही सन्मानित

कृषी दिनी जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांचा गौरव; आधुनिक शेती, एल निनो व्यवस्थापन आणि शासन योजनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारीही सन्मानित

सोलापूर : १ जुलै माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसह उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते. प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडाशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, लखन साहेब, कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, उत्तर सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत यांनी प्रास्ताविकातून कृषी दिनाचे महत्त्व विशद केले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि आधुनिक शेतीची गरज याबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पीक स्पर्धेत यश मिळविणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्षरोप, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 

याच कार्यक्रमात कृषी विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी हितासाठी केलेले कार्य आणि उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी त्यांना गौरविण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही करून द्यावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढवावा आणि शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमातील प्रमुख व्याख्याते अमोल शास्त्री, विषय विशेष तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर यांनी “एल निनो काळातील आपत्कालीन पीक व्यवस्थापन, सोयाबीन व तूर लागवडीची पंचसूत्री आणि खरीप हंगामाचे नियोजन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात पीक व्यवस्थापन, उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीच्या उपाययोजनांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत शासनाच्या विविध कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषी क्षेत्र सक्षम करण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे म्हणाल्या, “एक राजा राज्य चालवतो; मात्र एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टामुळे प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचते. त्यामुळे शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा भक्कम पाया आहे.”

 

समारोपाच्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी शेतकऱ्यांविषयीची आपुलकी व्यक्त करताना सांगितले, “मी स्वतः एक शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टांची, संघर्षाची आणि वेदनेची मला पूर्ण जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध राहील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले, तर कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमास कृषी विभाग, आत्मा सोलापूर तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!