क्राईम

शाळेत थरार! मुख्याध्यापिकांच्या केबीनमध्ये शिक्षकावर चाकूहल्ला; अल्पवयीन विद्यार्थ्याची धक्कादायक कृती

'मला नापास का केले?' या संतापातून वर्गशिक्षकावर जीवघेणा हल्ला; शिक्षक व्हेंटिलेटरवर, अवघ्या तीन तासांत आरोपी ताब्यात

शाळेत थरार! मुख्याध्यापिकांच्या केबीनमध्ये शिक्षकावर चाकूहल्ला; अल्पवयीन विद्यार्थ्याची धक्कादायक कृती

‘मला नापास का केले?’ या संतापातून वर्गशिक्षकावर जीवघेणा हल्ला; शिक्षक व्हेंटिलेटरवर, अवघ्या तीन तासांत आरोपी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले आहे. शाळेतील एका १७ वर्ष ५ महिने २८ दिवस वय असलेला अल्पवयीन विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकांच्या केबीनमध्येच वर्गशिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी (३० जून) दुपारी घडली. या हल्ल्यात शिक्षक विशाल फ्रान्सीस दुसिंग (वय ४३) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी दुपारी शाळेत शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) घेण्यासाठी आला होता. मुख्याध्यापिका स्वर्णलता मेंनेकांती यांनी त्याला नियमानुसार अर्ज सादर करून थकीत शुल्क भरण्याची सूचना केली. मात्र विद्यार्थ्याने अर्ज देण्यास नकार देत आपल्या वर्गशिक्षक विशाल दुसिंग यांना केबीनमध्ये बोलावण्याची मागणी केली.

मुख्याध्यापिकांनी दुसिंग यांना बोलावल्यानंतर चर्चा सुरू असताना विद्यार्थ्याने अचानक संताप व्यक्त केला. “मला मुद्दाम नापास केले, माझे वर्ष वाया घालवले,” असा आरोप करत त्याने शर्टाखाली लपवून आणलेला चाकू काढून शिक्षकांच्या पोटात वार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे शिक्षक जागीच कोसळले.

हल्ल्यानंतर विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकांनाही चाकूचा धाक दाखवला. आरडाओरडा ऐकून शिक्षक व कर्मचारी मदतीसाठी धावत आले. मात्र आरोपीने त्यांनाही धमकावत काही वेळ परिसरात दहशत निर्माण केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

जखमी शिक्षक विशाल दुसिंग यांना तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव, पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे आणि त्यांच्या पथकाने शोधमोहीम राबवत अवघ्या तीन तासांत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बालगृहात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू ऑनलाइन मागवल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो नववीत नापास झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करत होता. विशेष म्हणजे, ज्या शिक्षकांवर त्याने हल्ला केला ते मराठी आणि हिंदी विषय शिकवत होते. विज्ञान व गणित विषयाच्या परीक्षा किंवा मूल्यमापनाशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. तरीही विद्यार्थ्याने त्यांच्यावर नापास केल्याचा आरोप करत हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, आरोपी अल्पवयीन असला तरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर प्रौढ आरोपीप्रमाणे खटला चालविण्याबाबत न्यायालयात विनंती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वीही या मुलाने दुसऱ्या एका मुलाला चाकूचा धाक दाखवल्याची माहिती तपासात समोर आली असून, या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!