सोलापूर

आषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय : वारकरी सुविधांसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर

पंढरपुरात प्रथमच स्थायी समिती व विशेष सर्वसाधारण सभा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याबद्दल आभार, विकासकामांना गती

आषाढी वारीसाठी जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय : वारकरी सुविधांसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर

पंढरपुरात प्रथमच स्थायी समिती व विशेष सर्वसाधारण सभा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याबद्दल आभार, विकासकामांना गती

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक आणि विशेष सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून ग्रामपंचायतींना साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच वारकरी सुविधांशी संबंधित विविध विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते. यावेळी उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडाशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

बैठकीत आषाढी वारीच्या अनुषंगाने स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, निवारा केंद्रे, शौचालये, स्नानगृहे, मोबाईल चार्जिंग स्टेशन, औषध खरेदी, पालखी तळांची सुविधा आणि वारकरी स्वागत कमानी आदी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी वारीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख आहे. लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येतात. त्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आदर्श नियोजन करावे.”

यावेळी समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी ‘प्री वारी’ आणि ‘पोस्ट वारी’ ही अभिनव संकल्पना मांडली. वारीपूर्व काळात स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांचे नियोजन आणि वारीनंतर तात्काळ स्वच्छता व कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली.

सभेत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठीच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. यापूर्वी ८१ ग्रामपंचायतींना ३ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. आता आणखी १० ग्रामपंचायतींचा समावेश करून एकूण निधी साडेचार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे वारकरी सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध झाल्याबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पक्षनेत्या रश्मी बागल, सदस्य पृथ्वीराज माने, व्यंकटेश भालके, अतुल पवार, अजिनाथ देशमुख आदींनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.

वारकरी सुविधांमध्ये मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हँगर), शौचालये, स्नानगृहे, पालखी तळांना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषध खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन तसेच पायांना आराम देणाऱ्या फुट मसाजर सुविधांचाही समावेश आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या तत्परतेमुळे सर्व विकासकामांच्या निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्या असून कामांना गती मिळाल्याचे सदस्यांनी नमूद केले. विशेषतः ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठीची निविदा सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल सीईओ जैन यांनी कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

दरम्यान, विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव सदस्य पृथ्वीराज माने यांनी सभागृहात मांडला. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करत राऊत यांचे अभिनंदन केले.

आषाढी वारी अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आदर्श पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!