क्राईम

तांदूळवाडी येथे भीषण दुर्घटना : भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, 6 जणांची सुटका

श्री सिद्धनाथ दर्शनावरून परतताना काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यावर शोककळा

तांदूळवाडी येथे भीषण दुर्घटना : भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, 6 जणांची सुटका

श्री सिद्धनाथ दर्शनावरून परतताना काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यावर शोककळा

अकलूज (प्रतिनिधी) : म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली. पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी गावातील काही भाविक म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून परतत असताना दुपारच्या सुमारास तांदूळवाडी परिसरात हा भीषण अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत जाऊन पडली.

 

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

*ग्रामस्थांनी दाखवली तत्परता*

अपघाताचा आवाज ऐकताच तांदूळवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये 6 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

*प्रशासन घटनास्थळी*

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. विहिरीत पडलेले वाहन बाहेर काढण्याचे तसेच मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

*रांजणी गावावर दुःखाचा डोंगर*

या दुर्दैवी घटनेची माहिती रांजणी गावात पोहोचताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. एकाच गावातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!