डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पनाश अपार्टमेंटमागे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
पनाश अपार्टमेंट पुन्हा चर्चेत; तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पनाश अपार्टमेंटमागे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
पनाश अपार्टमेंट पुन्हा चर्चेत; तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
सोलापूर :- विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटच्या मागील बाजूस शुक्रवारी सायंकाळी नई जिंदगी परिसरातील एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सुफियान गुलाम रसूल शेख (वय २४, रा. अंबिका नगर, नई जिंदगी) असे मृत तरुणाचे नाव असून, हा प्रकार आत्महत्या, अपघात की घातपात आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजापूर नाका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुफियान शेख हा रोजच्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर पुन्हा घराबाहेर पडला होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आपल्या चार महिन्यांच्या बाळासाठी डायपर आणण्यासाठी तो घराबाहेर गेला होता. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास तो घरातून निघाला; मात्र बराच वेळ उलटल्यानंतर तो परतला नाही. दरम्यान, रात्री काही अपरिचित क्रमांकांवरून कुटुंबीयांना फोन आले. त्यानंतर पोलिसांचा फोन आल्यावर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पनाश अपार्टमेंटच्या मागील बाजूस एका व्यक्तीला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले पाहून परिसरातील वॉचमन हादरला. प्राथमिक माहितीनुसार, वॉचमन लघुशंकेसाठी गेला असता त्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या विजापूर नाका पोलिसांच्या पथकाने सुफियानला बेशुद्ध अवस्थेत तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
आत्महत्या की घातपात? तपासाकडे शहराचे लक्ष
सुफियानच्या मृत्यूभोवती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तो अपार्टमेंट परिसरात नेमका कसा पोहोचला? त्याच्या शरीरावरील जखमा कशा झाल्या? तो इमारतीवरून पडला की त्याच्यावर हल्ला झाला? या सर्व बाबींचा पोलिसांकडून बारकाईने तपास केला जात आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती तपासली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा मृत्यू आत्महत्येचा प्रकार आहे की घातपाताचा, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
चार महिन्यांच्या चिमुकल्याला ‘बाबा’ म्हणण्याआधीच काळाचा घाला
सुफियान शेख हा आपल्या वडील व काकांसोबत फॅब्रिकेशन व्यवसायात कार्यरत होता. नई जिंदगी परिसरात कुटुंबाचा छोटासा व्यवसाय असून, मेहनती व कुटुंबवत्सल म्हणून तो ओळखला जात होता. सुमारे दीड वर्षांपूर्वी जुने विडी घरकुल परिसरातील एका तरुणीसोबत त्याचा विवाह झाला होता. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. आपल्या लेकराच्या भविष्यासाठी मेहनत करणाऱ्या सुफियानचा अचानक झालेला मृत्यू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणारा ठरला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकल्याने ‘बाबा’ म्हणण्याआधीच त्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पनाश अपार्टमेंट यापूर्वीही चर्चेत
दरम्यान, याच पनाश अपार्टमेंटमध्ये यापूर्वी घडलेल्या एका धक्कादायक घटनेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये उद्योजक सुनील सदारंगानी (वय ६०, रा. पुणे) यांनी याच इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ६ फेब्रुवारी रोजी सोलापुरात आल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटच्या टेरेसवर जाऊन उडी घेतल्याचा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. होटगी रोडवरील व्यवसाय विकल्यानंतर ते पुण्यात वास्तव्यास होते. मात्र त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ अद्याप कायम असल्याचे बोलले जाते.
सध्या सुफियान शेखच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच सत्य समोर येणार आहे. शहरात या घटनेमुळे हळहळ आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.



