अक्कलकोटमध्ये बोगस उडीद बियाण्यांचा मोठा पर्दाफाश; ८.४६ लाखांचा साठा जप्त
शेतकऱ्यांची फसवणूक टळली! कृषी विभागाची मध्यरात्री धडक कारवाई

अक्कलकोटमध्ये बोगस उडीद बियाण्यांचा मोठा पर्दाफाश; ८.४६ लाखांचा साठा जप्त
शेतकऱ्यांची फसवणूक टळली! कृषी विभागाची मध्यरात्री धडक कारवाई
अक्कलकोट :- अक्कलकोट तालुक्यात कृषी विभागाने बोगस उडीद बियाण्यांविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल ८ लाख ४६ हजार रुपयांचा बनावट बियाण्यांचा साठा जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळल्याचे बोलले जात आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मंगळवारी (दि. २६) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट परिसरात बनावट उडीद बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने तातडीने कारवाई करत स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांच्या ताब्यातील उडीद बियाण्यांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या NUL-7 (विश्वास) या उडीद वाणाच्या बॅगची हुबेहूब नक्कल करून बनावट बियाणे विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. या ठिकाणाहून ४८ बॅग जप्त करण्यात आल्या. त्यानंतर अक्कलकोट शहरातील आबा कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. तेथे आणखी ४३२ बॅग आढळून आल्याने एकूण ४८० बॅग (प्रति ५ किलो) जप्त करण्यात आल्या.
जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची एकूण किंमत ८ लाख ४६ हजार ७२० रुपये इतकी आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आणि कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बी. बी. बाबर, अशोक कांबळे तसेच निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी वासुदेव नाटीकर यांनी सहभाग घेतला.
कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.



