अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवारांची अचानक पाहणी; अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उडाली धांदल
“कामात शिस्त हवीच!” - उपाध्यक्ष इंद्रजीत पवारांचा प्रशासनाला इशारा
अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवारांची अचानक पाहणी; अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उडाली धांदल
“कामात शिस्त हवीच!” – उपाध्यक्ष इंद्रजीत पवारांचा प्रशासनाला इशारा
सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालयात बुधवारी दुपारनंतर अचानकच अध्यक्ष दिपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी धडक तपासणी करत विविध विभागांची पाहणी केली. कोणतीही पूर्वकल्पना न देता झालेल्या या तपासणीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुख्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये पोहोचताच उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी तेथील अस्ताव्यस्त पडलेले रेकॉर्ड, धूळ, फाईल्सचे गट्टे आणि अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “रेकॉर्ड रूमची जबाबदारी कोणाकडे आहे?”, “स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे?”, “एवढी घाण कशी काय साचली?”, “रेकॉर्ड रुमची देखभाल कोण करतो?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

रेकॉर्ड रूममधील फाईल्सचे ढिगारे पाहून त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यालयाच्या देखभाल व स्वच्छतेसाठी नियुक्त कॉन्ट्रॅक्टरला बोलावून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागात जाऊन थेट कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. यावेळी हालचाल रजिस्टर तपासण्यात आले. जे कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते किंवा विनाकारण कार्यालयाबाहेर असल्याचे दिसून आले, त्यांच्यावर नोटीस काढण्याचे आदेश उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विशेष म्हणजे, चौकशीदरम्यान उपाध्यक्ष पवार प्रत्येक कर्मचाऱ्याचे नाव विचारत होते. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील आयडी कार्ड तपासून नाव आणि ओळख पडताळत होते. कर्मचारी किती आहेत, स्टाफ पूर्ण आहे का, कोण कुठे गेला आहे, याची बारकाईने माहिती घेतली जात होती. अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे अनेक कर्मचारी आणि अधिकारी हवालदिल झाल्याचे दिसून आले.
उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची ही कार्यशैली पाहताना उपस्थितांना अभिनेता अनिल कपूर यांच्या नायक चित्रपटाची आठवण झाल्याची चर्चा मुख्यालय परिसरात रंगली होती. चित्रपटातील धडक कारवाईप्रमाणेच उपाध्यक्ष पवार प्रत्यक्ष विभागात फिरून कर्मचाऱ्यांची चौकशी करत असल्याने कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती.

पत्रकारांशी बोलताना उपाध्यक्ष इंद्रजीत पवार म्हणाले, “आम्ही दुपारी सहज जेवण केले आणि अध्यक्षांना म्हटलं चला थोडं फिरून येऊ. त्यानंतर रेकॉर्ड रूम सह सर्व विभागाची पाहणी केली. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राहावी, कार्यालयीन कामकाज व्यवस्थित व्हावे आणि नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी अशा तपासण्या आवश्यक आहेत.”
या अचानक पाहणीमुळे जिल्हा परिषद मुख्यालयातील प्रशासनिक कामकाज, स्वच्छता व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून, पुढील काही दिवसांत प्रशासनाकडून कडक पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



