आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात RTO – वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
५० रिक्षांची तपासणी; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर १ लाख १८ हजार ९०० रुपयांचा दंड

आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात RTO – वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
५० रिक्षांची तपासणी; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर १ लाख १८ हजार ९०० रुपयांचा दंड
पंढरपूर (प्रतिनिधी) :- आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि वाहतूक पोलिसांनी बुधवारी संयुक्त धडक मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षांवर मोठी कारवाई केली.
या विशेष मोहिमेदरम्यान एकूण ५० रिक्षांची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी कागदपत्रांची मुदत संपलेली, वाहन परवान्यांमध्ये त्रुटी असलेली तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारी वाहने आढळून आली. याशिवाय नोंदणी मुदत संपलेल्या ऑटो रिक्षांवरही कठोर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत दोषी वाहनधारकांकडून तब्बल १ लाख १८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली होती.
ही मोहीम मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गवारे व श्री मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
कारवाईत मोटार वाहन निरीक्षक विशाल यादव, सहायक मोटार वाहन निरीक्षक भाग्यश्री रोडगे तसेच चालक कांबळे आणि पंडित यांच्या पथकाने सहभाग घेतला.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन व्हावे, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पुढील काही दिवस अशी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.



