राज्यात वाहन फिटनेस तपासणी आता पूर्णपणे डिजिटल; ५३ एटीएस केंद्रांना गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; प्रलंबित केंद्रे तातडीने सुरू करण्यावर भर

राज्यात वाहन फिटनेस तपासणी आता पूर्णपणे डिजिटल; ५३ एटीएस केंद्रांना गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; प्रलंबित केंद्रे तातडीने सुरू करण्यावर भर
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील वाहन फिटनेस तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता वाहनांची फिटनेस तपासणी केवळ स्वयंचलित प्रणालीद्वारेच केली जाणार आहे. यासाठी राज्यभरात उभारण्यात येणाऱ्या ५३ ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) केंद्रांच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उर्वरित केंद्रांची कामे तत्काळ पूर्ण करण्यावर भर दिला. सध्या राज्यात ७ एटीएस केंद्रे पूर्ण झाली असून, उर्वरित ३७ केंद्रे ऑगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित केंद्रांसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

दरम्यान, केंद्र शासनाने २३ सप्टेंबर २०२३ रोजी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम ६२ अंतर्गत १ एप्रिल २०२५ पासून सर्व परिवहन संवर्गातील वाहनांसाठी स्वयंचलित फिटनेस तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक मानवी तपासणी पद्धती पूर्णपणे बंद होणार असून, मशीनद्वारे अचूक आणि निष्पक्ष तपासणी होणार आहे.
राज्यात एटीएस केंद्रांची उभारणी विलंबाने होत असल्यामुळे केंद्र सरकारने ‘परिवहन/वाहन’ पोर्टलवरील प्रवेशावर काही निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांमुळे वाहनधारक आणि वाहतूकदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देत पोर्टलवरील निर्बंध हटवले आहेत, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, उपसचिव चेतन निकम तसेच एआरएआयचे उपसंचालक मकरंद पाठक उपस्थित होते.
•काय होणार बदल?•
* वाहन फिटनेस तपासणी पूर्णपणे डिजिटल व स्वयंचलित
* मानवी हस्तक्षेप कमी होऊन भ्रष्टाचारावर आळा
* अचूक आणि जलद तपासणी प्रक्रिया
* वाहनधारकांसाठी अधिक पारदर्शक सेवा
राज्य शासनाचा हा निर्णय वाहन तपासणी प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणणारा ठरणार असून, भविष्यात वाहतूक व्यवस्थेत अधिक शिस्त आणि सुरक्षितता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



