“जनगणना 2027 साठी सोलापूरमध्ये प्रशिक्षण; यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार जनगणना”
“जनगणना 2027 साठी सोलापूरमध्ये प्रशिक्षण; यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार जनगणना”
सोलापूर (प्रतिनिधी):- जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेत प्रगणक (कर्मचारी) आणि पर्यवेक्षक यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडलेल्या या प्रशिक्षणात जनगणनेच्या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले की, ही देशाची १६ वी जनगणना असून भारताच्या १५५ वर्षांच्या जनगणना परंपरेचा भाग आहे. मागील जनगणना 2018 दरम्यान पार पडली होती. पुढील जनगणना 2021 मध्ये अपेक्षित होती, मात्र कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 2026-27 या कालावधीत जनगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यंदाची जनगणना पारंपरिक पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल प्रणालीद्वारे केली जाणार आहे. HLO अॅपच्या माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार असून,
* १ मे ते १५ मे ,नागरिकांना स्वयं-नोंदणीची संधी
* १६ मे ते १५ जून, अधिकाऱ्यांकडून घराघरात जाऊन जनगणना
याबाबत प्रगणक व पर्यवेक्षकांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबिरात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांनी आपल्या भाषणात जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन हेच प्रभावी नियोजनाचे भक्कम अधिष्ठान आहे.”
* तसेच, प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.
* नागरिकांशी सौजन्याने वागावे.
* कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची राहू नये याची दक्षता घ्यावी.
अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षण शिबिरास अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी शशिकांत भोसले, जिल्हा जनगणना समन्वयक अजित बांड (जनगणना कार्यालय, मुंबई), सहाय्यक चार्ज अधिकारी/विभागीय अधिकारी श्री सरकाजी, सहाय्यक चार्ज अधिकारी/विभागीय अधिकारी सुनिता हिबारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रूथ भंडारे यांनी केले. तसेच सर्व प्रगणक, पर्यवेक्षक व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनगणना 2027 साठी सोलापूर महानगरपालिका सज्ज होत असून, डिजिटल पद्धतीने होणारी ही जनगणना अधिक पारदर्शक व अचूक होण्याची अपेक्षा आहे. प्रशिक्षण शिबिरामुळे अधिकाऱ्यांची तयारी मजबूत होऊन जनगणना प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडण्यास मदत होणार आहे.



