सोलापूर

कंबर तलाव सुशोभीकरणात कोट्यवधींचा घोटाळा? काम अर्धवट, खर्च मात्र पूर्ण!

महापालिकेच्या कामांवर संशय; कंबर तलाव प्रकरणी चौकशीची मागणी

कंबर तलाव सुशोभीकरणात कोट्यवधींचा घोटाळा? काम अर्धवट, खर्च मात्र पूर्ण!

महापालिकेच्या कामांवर संशय; कंबर तलाव प्रकरणी चौकशीची मागणी

सोलापूर :- शहरातील छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव सुशोभीकरण प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत झाल्याचा दावा स्थानिक समाजसेवकांनी पत्रकार परिषदेत केला.

समाजसेवक सागर टुरके यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, २०१९ ते २०२२ या कालावधीत विविध टेंडरद्वारे सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र, तलाव परिसरात त्या प्रमाणात काम झाल्याचे कुठेही दिसून येत नाही. उलट अनेक कामे अपूर्ण असून काही ठिकाणी तर कामच झाल्याचे चिन्ह नाही.

टुरके यांनी सांगितले की, स्थापत्य कामांवर ८ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला, मात्र प्रत्यक्षात झाडे लावलेली नाहीत.
रेलिंग व भिंतींच्या दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून अनेक भिंती अद्याप पडलेल्या अवस्थेत आहेत.
तलावातील गाळ काढण्यासाठी ७ कोटींचा खर्च दाखवण्यात आला, परंतु प्रत्यक्षात गाळ तसाच असल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे.

तलावातील जलपर्णी काढण्यासाठी २ कोटी ४२ लाखांचा टेंडर तामिळनाडूतील कंपनीला देण्यात आला होता. मात्र, सध्याही तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरतच्या कंपनीला देण्यात आलेल्या सोलर लाईट बसवण्याचे व पाण्याची गुणवत्ता तपासणीचे काम प्रत्यक्ष ठिकाणी दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे निधी खर्च आणि प्रत्यक्ष काम यामध्ये मोठी दरी असल्याचे स्पष्ट होत आहे.

तलाव परिसरात १५०० झाडे लावण्यासाठी १३ लाख रुपये खर्च दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात झाडे अस्तित्वात नाहीत. याशिवाय, पूर्वी माजी महापौर नलिनी चंदले यांच्या कार्यकाळात बांधलेली मुतारी पुन्हा नव्याने दाखवून बिलं काढल्याचा आरोपही करण्यात आला.

या सर्व प्रकारांची स्वतंत्र समितीद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, महापालिकेच्या आगामी सभेत नवीन नगरसेवकांनी हा कथित भ्रष्टाचार उघडकीस आणून सार्वजनिक निधी वाचवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या पत्रकार परिषदेस राजू कलमाडी, श्रीकांत गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!