शेतकरी कुटुंबातील तरुण ते झेडपी अध्यक्ष; दिपक वैद्य यांची संघर्षगाथा
बार्शीला पहिल्यांदाच अध्यक्षपद; राऊत समर्थक वैद्यांची दमदार एंट्री

शेतकरी कुटुंबातील तरुण ते झेडपी अध्यक्ष; दिपक वैद्य यांची संघर्षगाथा
बार्शीला पहिल्यांदाच अध्यक्षपद; राऊत समर्थक वैद्यांची दमदार एंट्री
सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील दिपक वैद्य यांची निवड झाली असून, त्यांच्या निवडीमागे संघर्ष, जिद्द आणि पुनरागमनाची प्रेरणादायी कहाणी दडलेली आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या वैद्य यांनी गावपातळीवरील अपयश झुगारून जिल्हा पातळीवर मोठा विजय मिळवत अध्यक्षपद गाठले आहे.
उपळाई ठोंगे गटातून निवडणूक लढवताना दिपक वैद्य यांनी तब्बल ९९८४ मताधिक्क्याने विजय मिळवत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. मात्र, याच वैद्य यांना २०२१ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या थेट लढतीत अवघ्या १७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतरही त्यांनी खचून न जाता नव्याने उभारी घेतली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जोरदार पुनरागमन केले.
राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बहुतांश जागांवर विजय मिळाल्याने अध्यक्षपद बार्शीकडे जाणे निश्चित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर वैद्य यांची निवड ही अपेक्षित असली तरी त्यांच्या संघर्षामुळे ती अधिक चर्चेत आली आहे.
धनगर समाजातील आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले दिपक वैद्य यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. आजही ते शेतीशी जोडलेले असून अध्यक्षपद निश्चित झाल्यानंतरही शेतीकामात गुंतलेले होते. त्यामुळे मातीशी नाळ जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक झाली आहे.

*उत्तर सोलापूरशी नातं, राजकारणात नवा दुवा*
नवनिर्वाचित अध्यक्ष दिपक वैद्य यांचे उत्तर सोलापूर तालुक्याशीही कौटुंबिक नाते आहे. त्यांचे आजोळ झेडपी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या मार्डी गावात असून त्यांचे बालपण तिथेच गेले आहे. तसेच ते नान्नज गावाचे जावई असल्याने उत्तर सोलापूरशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
एकूणच, पराभवातून सावरत मोठ्या विजयापर्यंतचा दिपक वैद्य यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या नेतृत्वाकडून जिल्ह्याच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.



