अध्यक्षपदासाठी दिपक वैद्य, उपाध्यक्षपदासाठी इंद्रजीत पवार; बिनविरोध निवडीची चिन्हे स्पष्ट

अध्यक्षपदासाठी दिपक वैद्य, उपाध्यक्षपदासाठी इंद्रजीत पवार; बिनविरोध निवडीची चिन्हे स्पष्ट
सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अर्जांमुळे बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट होत आहे. अध्यक्षपदासाठी दिपक वैद्य यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असून, उपाध्यक्षपदासाठी इंद्रजीत पवार यांनीही एकमेव अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता बळावली आहे.
जिल्हा परिषदेत सध्या भाजपचे ३८ सदस्य असल्याने विरोधकांकडून कोणताही अर्ज न आल्याने हे दोन्ही पदे बिनविरोध जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाने आधीच नेतृत्वाचे समीकरण ठरवले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तसेच रश्मी बागल यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या उपस्थितीमुळे पक्षाचा अधिकृत पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची मुदत सव्वा एक वर्षांसाठी राहण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने दिपक वैद्य आणि इंद्रजीत पवार यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असून, आगामी काळात विकासकामांच्या अंमलबजावणीत या नव्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.





