सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेचा 45 कोटी 83 लाखांचा अर्थसंकल्प सादर; विविध विभागांसाठी कोट्यवधींची तरतूद

बुधवारी होणार जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

सोलापूर जिल्हा परिषदेचा 45 कोटी 83 लाखांचा अर्थसंकल्प सादर; विविध विभागांसाठी कोट्यवधींची तरतूद

बुधवारी होणार जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेचा 2026-27 वर्षासाठीचा स्वउत्पन्नाचा 45 कोटी 83 लाख रुपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी सादर केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात 83 लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक राज असल्याने मागील काही काळापासून प्रशासकांमार्फतच अर्थसंकल्प सादर केला जात होता. मात्र, आता जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार असल्याने आगामी काळात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 27 मार्चपूर्वी मंजूर होणे आवश्यक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांसमोर हा अर्थसंकल्प सादर केला. अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आवश्यक असल्यास पुरवणी अर्थसंकल्पामध्ये काही बदल करण्याचा अधिकार अध्यक्षांना राहणार आहे.

गतवर्षी जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे बजेट 45 कोटी रुपये होते. यंदा त्यात वाढ होऊन 45 कोटी 83 लाख रुपये इतका अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

*विविध विभागांसाठी निधीची तरतूद*

यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये,

* मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानासाठी – 1 कोटी 10 लाख

* महिला व बालकल्याण विभाग – 3 कोटी 25 लाख

* समाजकल्याण विभाग – 2 कोटी 42 लाख

* दिव्यांग विभाग – 2 कोटी 30 लाख

* कृषी विभाग – 3 कोटी 85 लाख

* पशुसंवर्धन विभाग – 3 कोटी 20 लाख

* पाणी व पुरवठा विभाग – 2 कोटी 96 लाख

* शिक्षण विभाग – 5 कोटी 33 लाख

* आरोग्य विभाग – 5 कोटी रुपये

याशिवाय सामान्य प्रशासन विभागासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत लवकरच नवीन पदाधिकारी कार्यभार स्वीकारणार असल्याने नवीन वाहन खरेदी, वाहन खर्च, तसेच इमारत दुरुस्ती यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

दरम्यान, 18 मार्च रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता नवनिर्वाचित सदस्यांना प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर दुपारी 2 वाजता सर्वसाधारण सभा घेऊन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!