क्राईम

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्याकडून १२ हजारांची लाच; ग्रामपंचायत अधिकारी-शिपाई रंगेहात पकडले

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्याकडून १२ हजारांची लाच; ग्रामपंचायत अधिकारी-शिपाई रंगेहात पकडले

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थ्याकडून लाचेची मागणी करणाऱ्या उंबरगाव ग्रामपंचायतीतील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत प्रकाश मुकरे (वय ४५) आणि ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे (वय ४५) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर युनिटने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपयांचे घरकुल मंजूर झाले होते. या योजनेतील शेवटचा हप्ता देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून २० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर १३ मार्च २०२६ रोजी पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी स्वतःसाठी व ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत मुकरे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर ही रक्कम १२ हजार रुपये इतकी ठरविण्यात आली.

यानंतर १६ मार्च २०२६ रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच रक्कम शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अन्वये पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच एसीबी सोलापूरच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!