क्राईम

गॅस बुकिंग करताना घ्या काळजी, अन्यथा बँक खात्याला बसू शकतो फटका

सोलापुरात सायबर पोलिसांचे आवाहन 

गॅस बुकिंग करताना घ्या काळजी, अन्यथा बँक खात्याला बसू शकतो फटका

सोलापुरात सायबर पोलिसांचे आवाहन

सोलापूर :- गॅस बुकिंग करताना सावध रहा; बनावट लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा सोलापूर शहर सायबर पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. सध्या गॅस सिलिंडरच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून, बनावट लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

राज्यात सध्या गॅस सिलिंडरसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी गॅस गोडाऊनबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. दररोज लाखो ग्राहक गॅस सिलिंडरचे बुकिंग करत असल्याने सायबर गुन्हेगारांनी याच परिस्थितीचा फायदा घेत नागरिकांना फसवण्याचे नवे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.

सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना मोबाईलवर बनावट लिंक किंवा संदेश पाठवले जात आहेत. त्या लिंकवर क्लिक करून गॅस बुकिंग करा, अशी सूचना दिली जाते. अनेक नागरिक घाईगडबडीत लिंक उघडून त्यावरून ऑनलाइन पेमेंट करतात. मात्र ही लिंक अधिकृत नसल्याने संबंधितांची बँक खात्यातील माहिती गुन्हेगारांच्या हाती लागते आणि त्यानंतर खात्यातील रक्कम काढून घेतली जाते.

सायबर गुन्हेगार यापूर्वीही वीज बिल भरण्याच्या नावाखाली नागरिकांना बनावट लिंक पाठवत होते. ‘ऑनलाइन बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल’ अशा धमकीच्या संदेशांद्वारे अनेकांना फसवण्यात आले होते. आता गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली अशाच प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढू लागल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठ्यावरही काही प्रमाणात परिणाम झाला असून, गॅस सिलिंडर वेळेवर मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने शहरातील ग्राहकांसाठी २५ दिवसांचा, तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. अनेक ग्राहक सिलिंडर संपण्यापूर्वीच बुकिंग करत असल्याने ऑनलाइन बुकिंगचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंकचा वापर करून फसवणुकीचे प्रकार वाढवले आहेत.

*एपीके फाईलपासून विशेष सावधगिरी*

सायबर गुन्हेगार अनेकदा मोबाईलवर ‘एपीके’ (Android Package Kit) फाईल किंवा लिंक पाठवतात. ती फाईल डाउनलोड किंवा उघडल्यास मोबाईलवरील अॅक्सेस थेट गुन्हेगारांकडे जातो. त्यानंतर मोबाईलवरील मेसेज, ओटीपी, बँकिंग माहिती यासह सर्व माहिती त्यांना दिसू शकते. त्यामुळे अशा फाईल्स किंवा लिंकवर क्लिक करू नये, असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

जर चुकून अशा प्रकारचे अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल झाले असेल तर मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन ते अॅप त्वरित अनइन्स्टॉल करावे किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरूनच गॅस बुकिंग करावे आणि कोणतीही अनोळखी लिंक उघडण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!