अक्कलकोट नगरपरिषदेला विकासकामांसाठी 9.95 कोटींचा निधी मंजूर

अक्कलकोट :- अक्कलकोट शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेला विविध विकासकामांसाठी सुमारे 9 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली.
अक्कलकोट शहराच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन तसेच स्थानिक नागरिकांच्या सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या निधीतून अक्कलकोट नगरपरिषद हद्दीत अनेक महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.
* शहरातील स्वच्छतागृहे आणि सार्वजनिक शौचालये बांधकामासाठी – 2 कोटी रुपये
* अॅडव्हेंचर पार्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी – 2 कोटी 35 लाख रुपये
* रस्ते व गटारींच्या काँक्रेटीकरणासाठी – 3 कोटी 80 लाख रुपये
ही कामे सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान योजनेतून एकूण 8 कोटी 15 लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहेत.
याशिवाय, शहरातील वंचित भागातील सुविधा सुधारण्यासाठी दलित वस्ती सुधारणा योजनेतून 1 कोटी 23 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कालिका नगर येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी 55 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या विकासकामांमुळे शहरातील स्वच्छता, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अक्कलकोटमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या स्वामी भक्तांनाही या सुविधांचा लाभ होणार आहे.
नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी सांगितले की, या निधीसाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही सहकार्य मिळाले आहे. या निधीमुळे अक्कलकोट शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



