सोलापूर

राष्ट्रीय लोक अदालतीत मिळकत कर थकबाकीदारांना मोठा दिलासा; शास्ती व शुल्कात 50 टक्के सवलत

राष्ट्रीय लोक अदालतीत मिळकत कर थकबाकीदारांना मोठा दिलासा; शास्ती व शुल्कात 50 टक्के सवलत

सोलापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीत सोलापूर महानगरपालिका च्या मिळकत कर विभागाकडील सुमारे 10 हजार थकबाकीदारांची प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली आहेत.

या प्रकरणांबाबत मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. लोक अदालतीत सहभागी होणाऱ्या मिळकतदारांना थकबाकीतील नोटीस फी, वॉरंट फी व शास्तीच्या रकमेवर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील अनुसूची ‘ड’, प्रकरण 8 कराधान नियम 51 नुसार देण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

ज्या मिळकतदारांना नोटीसा प्राप्त झाल्या नाहीत, तसेच मागील लोक अदालतीत नोटीस मिळूनही त्यावेळी थकबाकी भरता न आलेल्या मिळकतदारांनाही या लोक अदालतीत सहभागी होता येणार आहे. अशा सर्वांनी शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी महानगरपालिकेत येऊन मिळकत कर विभागातील संबंधित कर निरीक्षक किंवा वसुली लिपिकांशी संपर्क साधून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

तसेच ज्यांना प्रत्यक्ष महानगरपालिकेत येणे शक्य नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विविध पेमेंट गेटवेच्या माध्यमातून (फोनपे, गुगलपे आदी) थकबाकी भरून शास्तीवरील 50 टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, लोक अदालतीच्या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर येथील मिळकत कर भरणा केंद्रही सुरू ठेवण्यात येणार असून नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपआयुक्त (कर) सुमन लोकरे यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!