पंढरपुरात घरगुती गॅसचा अवैध वापर उघड; १३ सिलेंडर जप्त, एकावर गुन्हा
पंढरपुरात घरगुती गॅसचा अवैध वापर उघड; १३ सिलेंडर जप्त, एकावर गुन्हा
पंढरपूर (प्रतिनिधी ):- घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने कडक मोहीम सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून पंढरपूर येथे पुरवठा विभागाने धाड टाकून १३ सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर किंवा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र पथक कार्यरत आहे.
पंढरपूर तालुक्यात तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ११ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सांगोला रोडवरील महाराज मठासमोर छापा टाकला. या कारवाईचे नेतृत्व पुरवठा निरीक्षक विजय तुकाराम बादल यांनी केले असून पुरवठा सहाय्यक उमेश हिंगमिरे यांनीही पथकात सहभाग घेतला होता.
धाडीदरम्यान त्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान आठ घरगुती गॅस सिलेंडर तसेच पाच व्यावसायिक गॅस सिलेंडर असा एकूण १३ सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गणेश राजू बोरीकर (वय २४, रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता गॅसचा काटकसरीने वापर करावा आणि शासनाच्या मोहिमेला सहकार्य करावे.



