सोलापूर जिल्ह्यात भाजपचा पंचायत समित्यांवर दबदबा; ११ पैकी ९ ठिकाणी सभापती पदावर भाजप
सोलापूर जिल्ह्यात भाजपचा पंचायत समित्यांवर दबदबा; ११ पैकी ९ ठिकाणी सभापती पदावर भाजप
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवत आपला राजकीय दबदबा कायम ठेवला आहे. जिल्ह्यातील एकूण ११ पंचायत समित्यांपैकी तब्बल ९ ठिकाणी भाजपचे सभापती निवडून आल्याने जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या २०२६-२७ या कालावधीसाठीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, करमाळा, माढा, मंगळवेढा आणि पंढरपूर या पंचायत समित्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सभापतीपद पटकावले. काही ठिकाणी उपसभापती पदावरही भाजपचेच उमेदवार निवडून आले असून काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
अक्कलकोट पंचायत समितीत सौ. रश्मी सागर हिप्परगी यांची सभापतीपदी तर श्री सागर सिद्धप्पा कल्याणशेट्टी यांची उपसभापतीपदी निवड झाली.
दक्षिण सोलापूर पंचायत समितीत श्री संदीप अमृत टेळे सभापती तर सौ. वर्षा सोमनाथ पटणे उपसभापती म्हणून निवडून आल्या.
उत्तर सोलापूर पंचायत समितीत सौ. तेजस्विनी अमोल बोराडे सभापती आणि श्री सुनील दगडू भोसले उपसभापती झाले.
मोहोळ पंचायत समितीत श्री असलम गफुर चौधरी सभापती तर सौ. उल्का राजकुमार पाटील उपसभापती म्हणून निवडून आल्या.
बार्शी पंचायत समितीत सौ. मीनाक्षी मुरलीधर रोंगे सभापती तर श्री संतोष चंद्रकांत निंबाळकर उपसभापती झाले.
करमाळा पंचायत समितीत सौ. पूजा सचिन ढेरे सभापती तर श्री अजिनाथ सर्जेराव विघ्ने (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) उपसभापती झाले.
माढा पंचायत समितीत श्री पंडित तुकाराम देशमुख सभापती तर सौ. स्वाती गिड्डे या भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार उपसभापती म्हणून निवडून आल्या.
मंगळवेढा पंचायत समितीत श्रीमती दिपाली आनंद ताड सभापती तर श्री अर्जुन तुकाराम मल्हाळे उपसभापती झाले.
पंढरपूर पंचायत समितीत श्री शुभम सुरेश आगलावे सभापती तर श्री प्रमोद हरी देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) उपसभापती म्हणून निवडून आले.
या निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात भाजपचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.




