सोलापूर

सिद्धरामांच्या नगरीची ओळख देशभर व्हावी; सोलापूरमध्ये स्वागत कमानी उभारण्याची मागणी

सिद्धरामांच्या नगरीची ओळख देशभर व्हावी; सोलापूरमध्ये स्वागत कमानी उभारण्याची मागणी

सोलापूर (प्रबुध्द राज वृत्तसंस्था):- ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे पवित्र मंदिर सोलापूर शहरात असतानाही परगावहून येणाऱ्या अनेक भाविकांना त्याची माहिती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवर भव्य स्वागत कमानी उभारून “श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर पावन नगरीत हार्दिक स्वागत” असा संदेश देण्यात यावा, अशी मागणी वीरशैव व्हिजन संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन देऊन लक्ष वेधले.

वीरशैव व्हिजनच्या मते, सोलापूर हे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असूनही अनेक भाविक पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रांना भेट देतात; मात्र शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिराकडे त्यांचे लक्ष जात नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे शहरात मंदिराची स्पष्ट माहिती देणारी व्यवस्था नसणे.

यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर स्वागत कमानी उभाराव्यात तसेच प्रत्येक महत्त्वाच्या चौकात “श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग” असे दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे परगावहून येणाऱ्या भाविकांना मंदिराचा मार्ग सहज सापडेल आणि सोलापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

संघटनेने ही मागणी केवळ महानगरपालिकेकडेच नव्हे तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही ईमेलद्वारे पाठवली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयालाही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, या निवेदनावेळी वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर कोंड्याल यांनी सांगितले की, शहराच्या धार्मिक आणि पर्यटन विकासासाठी हा महत्त्वाचा विषय असून येणाऱ्या महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव मांडला जाईल आणि सर्वानुमते निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

या प्रसंगी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ चौधरी, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, कार्यकारिणी सदस्य योगेश कापसे, नागराज कोंडे, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, बसवराज चाकाई, कार्तिक स्वामी, लोकेश इरकशेट्टी आणि अजिंक्य कटाप आदी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!