सोलापूर

तीन आठवड्यांनंतर शिक्षण विभागाची दखल; कट्टीमनी म्हणाले – ‘कारवाईशिवाय उपोषण थांबणार नाही’

तीन आठवड्यांनंतर शिक्षण विभागाची दखल; कट्टीमनी म्हणाले – ‘कारवाईशिवाय उपोषण थांबणार नाही’

सोलापूर :- अक्कलकोट तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय शिक्षक अक्कलकोट संघटनेचे तालुकाध्यक्ष महातेंश्वर कट्टीमनी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे सुरू केलेले उपोषण आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचले आहे. मात्र इतका कालावधी उलटूनही संबंधित प्रकरणात ठोस कारवाई न झाल्याने कट्टीमनी यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कट्टीमनी यांनी अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी यांच्याविरोधात तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. या संदर्भात चौकशी करून अहवालही सादर करण्यात आल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्षात कोणतीही प्रशासकीय कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील काही अधिकारी राजकीय दबावाखाली कारवाई टाळत आहेत का, असा सवाल कट्टीमणी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीही कट्टीमनी यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेत त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. मात्र यावेळी तीन आठवडे उलटून गेल्यानंतरच प्रशासनाने हालचाल केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

गुरुवारी प्रशासनाधिकारी स्वामी यांनी कट्टीमनी यांची भेट घेतली. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींची चौकशी सुरू असून त्यानुसार नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र त्यांना देण्यात आले. तरीही कट्टीमनी यांनी हे आश्वासन अपुरे असल्याचे सांगत, संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.

कट्टीमनी यांनी सांगितले की, त्यांना पूर्वी केवळ सहा दिवसांच्या आत कोणतीही सखोल चौकशी न करता निलंबित करण्यात आले होते. मात्र त्याच प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“जिल्हा परिषद शिक्षण विभाग किती कर्तव्यदक्ष आहे, हे तीन आठवड्यानंतर येऊन भेट घेतल्यावर दिसून येते,” अशी उपरोधिक टीकाही कट्टीमनी यांनी केली.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनाकडे शिक्षक संघटनांसह जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!