अधिस्वीकृती समितीच्या बैठकीदरम्यान सभापती प्रा. राम शिंदे यांची सदस्यांशी संवाद साधत सदिच्छा भेट
पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार - सभापती प्रा. राम शिंदे

अधिस्वीकृती समितीच्या बैठकीदरम्यान सभापती प्रा. राम शिंदे यांची सदस्यांशी संवाद साधत सदिच्छा भेट
पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार – सभापती प्रा. राम शिंदे
शिर्डी (प्रतिनिधी):- राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या निमित्ताने विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी समिती सदस्यांची सदिच्छा भेट घेत पत्रकारांशी संबंधित विविध मुद्द्यांवर संवाद साधला. बदलत्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण होत असून त्यांचे वास्तव लक्षात घेऊन पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी आपण सकारात्मक आहोत, असे आश्वासन सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले.
शिर्डी येथे आयोजित या बैठकीदरम्यान अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारितेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारांनी समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले असून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करून स्वागत केले.
या प्रसंगी राज्य समितीचे सदस्य नवनाथ दिघे, प्रकाश कुलथे, नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके तसेच राज्य समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पत्रकारांच्या हितासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.




