नाशिक – सोलापूर – अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्प : नुकसान भरपाई न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी गावभेट दौरा
नाशिक – सोलापूर – अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्प : नुकसान भरपाई न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी गावभेट दौरा
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत सुरू असलेल्या “महसूल जनसंवाद – महसूलची वारी, शेतकऱ्यांच्या दारी” या उपक्रमाअंतर्गत नाशिक – सोलापूर – अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी विशेष गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ११, कृष्णा खोरे, सोलापूर कार्यालयाच्या वतीने हा दौरा आयोजित करण्यात आला असून ज्यांनी नोटीस मिळूनही अद्याप नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारलेली नाही अशा खातेदार शेतकऱ्यांना थेट गावात जाऊन रक्कम वाटप करण्यात येणार आहे.
या संदर्भात दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी ठरलेल्या तारखेला उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात ९ मार्च २०२६ रोजी मुस्ती येथे मंडळ अधिकारी कार्यालय, गांधी चौक येथे कार्यक्रम होणार आहे. १० मार्च रोजी तांदुळवाडी व धोत्री गावांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक होईल. ११ मार्च रोजी हिंगणी (आर), रातंजन, सर्जापूर, सासुरे, वैराग या गावांसाठी वैराग येथील शहाजीराव पाटील सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १३ मार्च रोजी अलीपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक होईल, तर १४ मार्च रोजी कठेवाडी, कव्हे, कासावाडी, लक्ष्याचीवाडी, नागोबाचीवाडी, काळेगाव, मानेगाव, घाणेगाव, दडशिंगे व पानगाव या गावांसाठी पानगाव ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम पार पडणार आहे.
अक्कलकोट तालुक्यात १६ मार्च २०२६ रोजी चपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत अक्कलकोट (ग्रा.), हसापूर, चपळगांववाडी, दहिटणेवाडी, बोरेगाव, डोंबरजवळगे, संगोगी (ब), मुगळी, दुधनी, नागोरे, मैंदर्गी, इटगे, नागणहळ्ळी या गावांतील बाधित शेतकरी सहभागी होणार आहेत. पुढे १७ आणि १८ मार्च रोजी मैंदर्गी नगरपरिषद सभागृहात तसेच नागणहळ्ळी व मिरजगी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. ११ डॉ. सीमा होळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे संबंधित शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप नुकसान भरपाई स्वीकारलेली नाही त्यांनी निश्चित तारखेला संबंधित ठिकाणी उपस्थित राहून रक्कम स्वीकारावी.




