सोलापूर

बालविकासात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे – सीईओ कुलदीप जंगम; 112 कर्मचाऱ्यांचा सन्मान

बालविकासात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे – सीईओ कुलदीप जंगम; 112 कर्मचाऱ्यांचा सन्मान

सोलापूर : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने सन 2025 मधील आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. सोलापूर शहरातील जामगुंडी मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

जिल्ह्यातील 16 ग्रामीण प्रकल्पांमधून निवड झालेल्या 16 अंगणवाडी पर्यवेक्षिका, 48 अंगणवाडी सेविका आणि 48 मदतनिस अशा एकूण 112 कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनिस उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिस या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असल्याचे सांगितले. बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी निष्ठेने पार पाडत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या कार्यामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. लेक लाडकी योजना, एकल महिला सर्वेक्षण, प्रधानमंत्री मातृवंदन योजना तसेच आदिशक्ती योजना यांची प्रभावी अंमलबजावणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व योजना प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विशेष संदेशही देण्यात आला. महिलांचे सशक्तीकरण, समाजातील त्यांचे योगदान आणि नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित करत “स्त्री ही शक्ती, प्रेरणा आणि परिवर्तनाची मूर्ती आहे” हा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी पुरस्कार प्राप्त अंगणवाडी कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रताप रुपनर, शिवानंद मगे, साहेबराव देशमुख, रेणुका प्रथमशेट्टी, पांचाळ, अमिता वसेकर आणि निर्मला कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!