सोलापूर

जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर मनपाचा ‘महिला महोत्सव 2026’; बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन

जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर मनपाचा ‘महिला महोत्सव 2026’; बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन

सोलापूर :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग तसेच DAY-NULM योजनेच्या माध्यमातून ‘महिला महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. 9 ते 11 मार्च 2026 या कालावधीत सोलापूर महानगरपालिका आवारातील इंद्रभवन परिसर, पार्क चौक येथे हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा आणि महिलांच्या उद्योगाला चालना मिळावी हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. या निमित्ताने शहरातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.

महिला स्वयं सहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी विविध उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. मनपाच्या विविध योजनांतर्गत आणि वित्तीय संस्थांच्या मदतीने महिलांना आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे. त्यातून तयार होणाऱ्या वस्तूंना या प्रदर्शनाद्वारे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

प्रदर्शनात हाताने बनवलेल्या तसेच आरोग्यदायी खाद्यपदार्थांपासून ते हस्तकला वस्तूंपर्यंत विविध उत्पादने उपलब्ध असतील. यामध्ये विणकाम, लाकडी कोरीव काम, कापडी शिवणकामाच्या वस्तू, अगरबत्ती, सुगंधी उत्पादने, मसाले, चटणी, पापड, ड्रेस मटेरियल, साड्या, कडक भाकरी, शेंगांची चटणी, शेंगा पोळी, धपाटे, विविध प्रकारचे पापड, तिखट-मसाले, हर्बल तेल, झाडू-खराटे, मूर्ती, कॉस्मेटिक साहित्य यांसह अनेक वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय वडा पाव, पाणीपुरी, चायनीज पदार्थ, ज्यूस, बिस्किटे, हेल्थ ड्रिंक पावडर, गुळ पावडर, नाचणी-ज्वारी बिस्किटे अशा खाद्यपदार्थांचाही समावेश असणार आहे.

महिला महोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. 16 वर्षांवरील सर्व मुली आणि महिलांना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे.

९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत. १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ‘होम मिनिस्टर’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता वैयक्तिक गीत गायन आणि फॅशन शो अथवा वेशभूषा स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धांमधील विजेत्यांना ११ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा तसेच नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल आणि मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

महिला महोत्सवातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 9011385200 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!