सोलापूर

सोलापूर महापालिका निवडणूक २०२५ : नामनिर्देशन अर्ज विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १,०७४ अर्जांची विक्री

सोलापूर महापालिका निवडणूक २०२५ : नामनिर्देशन अर्ज विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १,०७४ अर्जांची विक्री

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. मात्र, आजच्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही.

नामनिर्देशन अर्ज विक्रीस इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आज एकूण १,०७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय अर्ज विक्रीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी–१ यांच्याकडून १६७, निवडणूक निर्णय अधिकारी–२ यांच्याकडून १९२, निवडणूक निर्णय अधिकारी–३ यांच्याकडून १३०, निवडणूक निर्णय अधिकारी–४ यांच्याकडून १२०, निवडणूक निर्णय अधिकारी–५ यांच्याकडून १७१, निवडणूक निर्णय अधिकारी–६ यांच्याकडून १२६, तर निवडणूक निर्णय अधिकारी–७ यांच्याकडून १६८ नामनिर्देशन अर्जांची विक्री करण्यात आली आहे.

ही प्रक्रिया सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील निर्धारित कक्षामध्ये दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पद्धतीने पार पाडण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असल्याने आगामी दिवसांत नामनिर्देशन अर्ज दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नामनिर्देशन अर्ज भरताना उमेदवारांनी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निर्गमित केलेल्या आदर्श आचारसंहिता व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, महानगरपालिकेकडून आवश्यक असलेली ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) व इतर अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करून विहित कालमर्यादेत नामनिर्देशन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, उमेदवारी अर्ज माघार तसेच मतदान प्रक्रिया या सर्व टप्प्यांचे आयोजन मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसारच करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!