देश - विदेश

मालवाहतुकीत सोलापूर विभागाचा नवा विक्रम; पाकणी साइडिंगमधून ४४.२ कोटींचा महसूल

  1. मालवाहतुकीत सोलापूर विभागाचा नवा विक्रम; पाकणी साइडिंगमधून ४४.२ कोटींचा महसूल जे

सोलापूर :- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मालवाहतूक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आयओसीएल पाकणी साइडिंगवर पहिल्याच वर्षात पेट्रोलियम उत्पादनांच्या ३०१ रेकचे लोडिंग पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोलापूर विभागाला ४४.२ कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल प्राप्त झाला असून, हा विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

आयओसीएल पाकणी साइडिंगवर पेट्रोलियम, तेल व वंगण (POL) लोडिंगची पहिली कार्यवाही २८ जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आली होती. अवघ्या एका वर्षाच्या आतच या साइडिंगने सातत्यपूर्ण आणि मजबूत वाढ नोंदवत जानेवारी २०२६ पर्यंत ३०१ रेक यशस्वीपणे लोड करून मालवाहतूक क्षमतेचे त्रिशतक पूर्ण केले आहे.

*अनेक राज्यांना जोडणारी मालवाहतूक साखळी*

पाकणी साइडिंगमधून कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांतील विविध ठिकाणी पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक केली जात आहे. यामध्ये हिरेनंदुरू, मिरज, विजयपुरा, देसूर, नवलूर आणि रामगुंडम या प्रमुख गंतव्यस्थानांचा समावेश असून, यामुळे बहुराज्यीय प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अधिक भक्कम झाली आहे.

*सुरक्षित व पर्यावरणपूरक इंधन वाहतूक*

पाकणी साइडिंगवर प्रामुख्याने हाय स्पीड डिझेल (HSD) आणि मोटर स्पिरिट (MS) या पेट्रोलियम उत्पादनांचे हाताळणी व लोडिंग करण्यात येते. रेल्वेमार्गे इंधन वाहतुकीमुळे सुरक्षितता, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक व्यवस्था सुनिश्चित होत आहे.

*धोरणात्मक लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदय*

आयओसीएल पाकणी साइडिंग हे आता एक महत्त्वाचे धोरणात्मक लॉजिस्टिक केंद्र बनले आहे. ही सुविधा महाराष्ट्रातील पहिली आयओसीएल रेक-लोडिंग साइडिंग,देशातील आयओसीएलची ९वी विशेष मार्केटिंग रेक-लोडिंग सुविधा,तसेच भारतभरातील रिफायनरीसह एकूण १८वी रेक-लोडिंग सुविधा ठरली आहे.

१९९६ मध्ये अधिसूचित झालेल्या या साइडिंगवर पूर्वी मर्यादित प्रमाणात पेट्रोलियम मालाची आवक होती. मात्र, २०२५ मध्ये बाह्य लोडिंग कामकाज सुरू झाल्यानंतर या साइडिंगचे रूपांतर एका प्रमुख मालवाहतूक केंद्रामध्ये झाले आहे.

*पाइपलाइन–रेल्वे समन्वयामुळे यश*

हा संपूर्ण मालवाहतूक उपक्रम कोयाली (वडोदरा) ते पाकणी (सोलापूर) दरम्यानच्या ७५२ किमी लांबीच्या कोयाली–अहमदनगर–सोलापूर पाइपलाइन (KASPL) द्वारे समर्थित आहे. २०२३ मध्ये कार्यान्वित झालेल्या या पाइपलाइनची वार्षिक क्षमता ५.० दशलक्ष मेट्रिक टन असून, कोयाली रिफायनरीतून इंधन थेट पाकणी डेपोपर्यंत पोहोचवले जाते. त्यानंतर रेल्वे रेकद्वारे विविध डेपो व उपभोग केंद्रांपर्यंत वितरण करण्यात येते.

*आर्थिक विकासाला चालना*

आयओसीएल पाकणी साइडिंगवरील दमदार कामगिरी ही भारतीय रेल्वे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील प्रभावी समन्वयाचे उदाहरण आहे. मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग मालवाहतूक क्षमता व महसूल वाढवण्यासोबतच महाराष्ट्र, शेजारील राज्ये आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!