महाराष्ट्र

आचारसंहितेवर कडक नजर; महानगरपालिका आयुक्तांना राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्ट आदेश

आचारसंहितेवर कडक नजर; महानगरपालिका आयुक्तांना राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्ट आदेश

मुंबई (प्रतिनिधी):- महानगरपालिका निवडणुका सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुसज्ज ठेवून मतदारांना सुलभपणे मतदान करता येईल, यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात आज सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह राज्य निवडणूक आयोगातील विविध अधिकारी उपस्थित होते.

दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, भरारी पथकांच्या माध्यमातून आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था करावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधावा. कोणतीही गैरप्रकाराची तक्रार तातडीने हाताळली जावी, यासाठी स्पष्ट कार्यपद्धती ठरवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागनिहाय जागानिहाय आरक्षणाची माहिती, नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रांचे नमुने, आवश्यक अधिकारी-कर्मचारी, तसेच सर्व आवश्यक साहित्याची त्वरित व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. मतदारांना सहज व सुलभ मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर किमान सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शक्य त्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे किंवा पिंक मतदान केंद्रे उभारण्यावर भर देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

बैठकीत सचिव सुरेश काकाणी यांनी सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी महानगरपालिका अधिनियम, तसेच राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश व मार्गदर्शक सूचना यांची तपशीलवार माहिती देत निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या.

या बैठकीमुळे महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला गती मिळणार असून, मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!