तालुका कृषी अधिकारी लाच घेताना रंगेहात; एसीबीची कारवाई
सोलापूर (प्रबुध्द राज न्युज) :- शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी असलेल्या महा-डीबीटी ऑनलाईन प्रणालीवर मंजुरी देण्यासाठी १०,००० रुपयांची लाच मागणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याला आज लाच घेताना अॅण्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांच्याकडून रंगेहात पकडण्यात आले आहे.
आरोपीचे नाव धनंजय सुभाष शेटे (वय ३१), पद – तालुका कृषी अधिकारी वर्ग-२, उत्तर सोलापूर असे असून, त्यांची सध्या नियुक्ती तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उत्तर सोलापूर येथे आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडून कृषी अवजारे मिळावीत म्हणून महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते. या अर्जाला मंजुरी देण्यासाठी आरोपी शेटे यांनी तक्रारदाराशी १०,००० रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीअंती ८,००० रुपये घेण्याचे आरोपीने मान्य केले होते.
त्यानंतर तक्रारदाराने ही माहिती एसीबीकडे दिली. त्यानुसार पडताळणी करुन आज दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सापळा कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान आरोपी शेटे यांनी कार्यालयातील टेबलवरील कागदांमध्ये ८,००० रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. त्याच क्षणी एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे,श्री. अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे,श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर तसेच शैलेश पवार (पोलीस निरीक्षक), रविंद्र लांभाते (पोलीस निरीक्षक) आणि एसीबी सोलापूरचे पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.
नागरिकांना एसीबीचे आवाहन:
कोणताही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी लाच मागत असल्यास तत्काळ तक्रार करावी असे आवाहन एसीबीने केले आहे.
📞 टोल फ्री क्रमांक: १०६४
📲 व्हॉट्सअॅप: ९८२३२२५४६५
🌐 वेबसाईट: acbmaharashtra.gov.in



