फळबाग अनुदानासाठी २५ हजाराची लाच मागणी; कृषी सहाय्यकावर ACB कडून गुन्हा दाखल
फळबाग अनुदानासाठी २५ हजाराची लाच मागणी; कृषी सहाय्यकावर ACB कडून गुन्हा दाखल
अक्कलकोट (प्रतिनिधी):- शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फळबाग लागवड अनुदानासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कृषी सहाय्यकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीकांत अशोक सवळी (वय ३९), कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अक्कलकोट यांनी शासकीय काम करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदार शेतकऱ्याने त्यांच्या शेतात आंबा फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. शासनाकडून फळबाग लागवडीसाठी टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत असल्याने कृषी सहाय्यक सवळी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्डधारकांकडून खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले होते. यानंतर मजुरीची रक्कम तसेच रोपे खरेदी, लागवड व अनुदानाशी संबंधित काम करून देण्यासाठी कृषी सहाय्यकाने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली.
या तक्रारीच्या अनुषंगाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान संबंधित कृषी सहाय्यकाने एकूण २५ हजार रुपयांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये तत्काळ देण्यास सांगितले, तर उर्वरित १० हजार रुपये नंतर घेण्याचे स्पष्ट केले. लोकसेवक या नात्याने सार्वजनिक कर्तव्य बजावताना गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक ०४/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत १० डिसेंबर २०२५ रोजी सापळा रचण्यात आला होता.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक श्री प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री रविंद्र लांभाते यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री शैलेश पवार करीत आहेत.
दरम्यान, कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्यावतीने काम करणारा खासगी इसम शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
📞 संपर्क माहिती (जनहितासाठी)
टोल फ्री क्रमांक: 1064
दूरध्वनी: 0217-2312668
संकेतस्थळ: www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप: acbmaharashtra.net


