नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या नूतन पाच मजली इमारतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या नूतन पाच मजली इमारतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर (प्रतिनिधी) :- सिव्हील लाईन परिसरात उभारण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) नागपूर विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या इमारतीमुळे विभागाच्या कार्यक्षमता आणि तपासणी प्रक्रियेत अधिक वेग, अचूकता आणि पारदर्शकता येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त श्रीधर डुबे-पाटील, सह आयुक्त कृष्णा जयपुरकर, मिलिंद काळेश्वरकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाच मजली ही नवी इमारत १,५०० चौरस मीटर जागेवर बांधण्यात आली असून विभागाच्या विविध शाखांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग तर दुसऱ्या माळ्यावर अन्न विभागाचे कार्यालय कार्यरत राहणार आहे. उर्वरित मजल्यांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, तपासणी सुविधा, अॅनालिसिस उपकरणे आणि खाद्य पदार्थांमधील भेसळ व औषध गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवीन उपकरणांमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या दैनंदिन तपासणी व गुणवत्ता नियंत्रणाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमतेने सुधारणा होणार असून नागपूर विभागातील नागरिकांना सुरक्षित अन्न व औषध सेवा सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या लोकार्पणानंतर FDA च्या कामकाजात पारदर्शकता, जलद तपासणी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यास नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त झाला.



