उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चैत्यभूमीवर अभिवादन; आज स्वीकारणार पदभार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चैत्यभूमीवर अभिवादन; आज स्वीकारणार पदभार
मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील पवित्र चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, तसेच पार्थ अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी डॉ. आंबेडकरांच्या समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचा पुनरुच्चार केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चैत्यभूमी भेटीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचा आदर राखत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजातील वंचित, दुर्बल आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासन कटिबद्ध राहील, असे त्यांनी नमूद केले.
चैत्यभूमी ही केवळ स्मारक नसून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थळ आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकास या तत्त्वांना प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, या भेटीद्वारे सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांप्रती शासनाची निष्ठा पुन्हा अधोरेखित झाल्याचे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मानले जात आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनात लोककल्याणाभिमुख धोरणांना चालना देण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.



